कल्याण : ऐन उन्हाळ्याच्या दिवसात राज्यातील खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसेंदिवस विविध आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण ग्रामीणमधील अमृत पाणीपुरवठा योजनेबाबात प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजू पाटील म्हणाले की, अमृत योजनेतील ठेकेदाराला एवढे लूबाडले आहे की तो ठेकेदार आत्महत्या करायचा बाकी आहे. पाकिस्तानला मिळणारं पाणी रोखल्यानंतर आपण मजा घेतो. पण ही ही गावं तर पाकिस्तानात नाहीत ना? या परिसरात जाणीव जाणीवपूर्वक टँकर माफीयांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे, मनसे नेते राजू पाटील यांनी हा गंभीर आरोप केले आहे नक्की अमृत योजनेतील ठेकेदाराला त्रास देणारा आणि टँकर माफिया मागे कोण आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे. कल्याण ग्रामीण मधील आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी वधू वर सामुदायिक विवाह सोहळ्यात मनसे नेते राजू पाटील सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही कल्याणमधील समस्या मांडली होती.
याचबरोबर वाहतूक कोंडीच्या समस्येवरही राजू पाटील यांनी परप्रांतीयांवर ताशेरे ओढले आहेत. अनधिकृतपणे राहणाऱ्या परप्रांतीयांना मारून हाकलले पाहिजे. आमचे पाणी ते घेतात. त्यांच्यामुळे ट्रॅफिक समस्या आणि इतर समस्या होतात. ट्रेनमध्ये गर्दी त्यांच्यामुळे वाढली आहेत. आम्ही बोललो तर प्रांतवादी होतो. अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यांबद्दल मी बोलतोय ते कोणी पण असेल. आम्हाला प्रांतवादी बोलले जाते सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी मेट्रोच्या कामात टक्केवारीचा मलिदा खात आहेत त्यामुळे कल्याण शीळ रस्यावर वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसते.
राजू पाटील म्हणाले की, कल्याण शीळ मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ट्राफिक पोलिसांची काही चूक नाही. सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी टक्केवारीचा मलिदा खात आहेत. या प्रकल्पाचे अजून भूसंपादन झालेले नाही. ट्रॅफिक पोलिसांचा या मेट्रो प्रकल्पाला विरोध आहे. ट्राफिक पोलिसांनी दोनदा पत्र दिले आहे. आधी तळोजा बाजूची मेट्रो चालू करा दोन वर्षा नंतर या बाजूचे काम सुरू करा. राजू पाटील असंही म्हणाले की, कल्याण शीळ रोडला पर्यायी रस्ते द्या, अशी मागणी मी वारंवार केली आहे. ते लक्ष देत नाहीत फक्त टेंडर काढून टक्केवारी खाऊन हेच उद्योग चालले आहेत. असा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी सत्ताधारीयांवर केला आहे. कल्याण ग्रामीण मधील आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी वधू वर सामुदायिक विवाह सोहळ्यात मनसे नेते राजू पाटील सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.