बदलापुरातील सात महिन्याच्या अधिराज पार्सेकर या बाळाची जन्मापासूनच एका दुर्धर आजाराशी अक्षरशः झुंज सुरू आहे. आईच्या कुशीत असलेल्या या गोंडस बाळाला गर्भातच एका दुर्धर आजाराची लागण झाली असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. सात महिन्याच्य़ा या बाळावर तब्बल सहा वेळा विविध शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराला बदलापूरच्या मांजरली येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हे खासगी रुग्णालय जबाबदार आहे असा गंभीर आरोप बाळाच्या पालकांनी केला आहे.
याचं कारण म्हणजे बदलापुरात राहणारे वैभव पार्सेकर यांच्या पत्नीचे गरोदरपणाचे सर्व उपचार मांजरली येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी या खासगी रुग्णालयाचे डॉ. शिवप्रशांत धवन यांच्याकडे सुरू होते. मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टर धवन यांनी आईच्या गर्भात असलेल्या बाळाला गंभीर आजाराची लागण झाली आहे हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत दिसत असतांना देखील याबाबत कोणतीच माहीत दिली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच काही चुकीच्या औषध गोळ्यांमुळे गर्भाशयाला त्रास देखील झाला असा गंभीर आरोप बाळाच्या आईने केला आहे. मात्र रुग्णालयाने पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
याबाबत न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. शिवप्रशांत धवन यांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत, मात्र याच रुग्णालयात सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर ने बाळाच्या पालकांना याबाबत माहिती दिली आहे किंवा नाही याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया डॉ. धवन यांनी दिली आहे. आमच्या बाळाच्या आजाराची माहिती लपवणाऱ्या रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी बाळाचे वडील वैभव पार्सेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.