धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देतानाच, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय या योजनेच्या माध्यमातून घेतला आहे. जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयावर सोपविण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पात्र कर्जदारांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७,६२९ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर नोंदविली आहे. ही प्रक्रिया पुढील टप्प्यातील पडताळणी व मंजुरीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
योजनेअंतर्गत सर्वाधिक लाभार्थी धाराशिव तालुक्यात असून येथे २,७१७ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी २३ कोटी ८६ लाख १२ हजार रुपये इतकी रक्कम प्रस्तावित आहे.
यानंतर कळंब तालुक्यात १,३७९ शेतकरी (८ कोटी ७९ लाख ८४ हजार रुपये), परंडा तालुक्यात ९८१ शेतकरी (५ कोटी ८७ लाख ९ हजार रुपये), तुळजापूर तालुक्यात ८६९ शेतकरी (५ कोटी ८७ लाख ९ हजार रुपये), उमरगा तालुक्यात ६०१ शेतकरी (४ कोटी २ लाख ९ हजार रुपये), वाशी तालुक्यात ५०३ शेतकरी (२ कोटी २ लाख ५० हजार रुपये), भूम तालुक्यात ३८३ शेतकरी (१ कोटी ७१ लाख ८२ हजार रुपये) आणि लोहारा तालुक्यात १९६ शेतकरी (१ कोटी २५ लाख २७ हजार रुपये) यांचा समावेश आहे.
सहकार विभागाच्या पोर्टलवर माहिती अपलोड झाल्यानंतर संबंधित खात्यांची पडताळणी, पात्रतेची अंतिम छाननी आणि शासनस्तरावरील मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित प्राथमिक कृषी पतसंस्था, सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क ठेवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणे, त्यांची आर्थिक घडी सावरणे आणि भविष्यातील शेतीसाठी नव्याने पतपुरवठ्याचा मार्ग मोकळा करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून, धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाचा दिलासादायक टप्पा ठरत आहे.






