फोटो सौजन्य: Yandex
ठाणे/ स्नेहा काकडे : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. याचपार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येत आहे. आज बदलापूरमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन बदलापूर येथे होणार आहे. केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन बदलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सुरवळ चौक, बदलापूर (पूर्व) येथे आज, दि.9 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे.
हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अमित पुरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे.
• बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सायरन वाजणार.
• Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार.
• सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.
• धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.
• संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.
याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी या मॉक ड्रिलला गांभीर्याने घ्यावे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडावी. मॉक ड्रिलच्या दरम्यान सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.या दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, हे मॉक ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन तहसिलदार अमित पुरी यांनी केले आहे.