ठाणे /स्नेहा जाधव, काकडे : तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने ठाणे शहरात जनजागृती करण्यात आली होती. शासनाच्या वतीने सिनेमागृह तसंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील तंबाखूबाबत जनजागृती करण्यात येते. तंबाखूचे हेच दुष्परिणाम सर्वसामान्यांपर्यंत अजून प्रखरपणे पोहोचावं यासाठी तंबाखू विरोधी दिनाचं औचित्य साधत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग आणि इतर गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर सामाजिक आणि कुटुंबीय पातळीवर जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी स्पष्ट केले. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
“मुलांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगितल्यास पुढची पिढी तंबाखूमुक्त राहील. पालकांनी मुलांच्या मनात तंबाखूविरोधी विचार बिंबवायला हवा,” असे मार्गदर्शन डॉ. कैलास पवार यांनी केले. त्यांनी सांगितले की, तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात व टाइप २ मधुमेह होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
जिल्हा रुग्णालय, ठाणे यांच्यावतीने जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तंबाखूविरोधी फलक, मौखिक स्वच्छतेचे महत्व, ब्रश बदलण्याचे अंतर, दंत तपासणीचे अंतर, तोंडात कोणतेही बदल दिसल्यास तत्काळ तपासणी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, आणि वक्तृत्व स्पर्धा यामार्फत जनजागृती केली. विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. विलास साळवे, डॉ. सुषमा कांबळे, आदी मान्यवर नागरिक व रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
भारतामध्ये दरवर्षी लाखो मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळतात. तोंडात कोणताही पांढरा किंवा लालसर चट्टा, जखम न भरणे, तोंड उघडताना त्रास इत्यादी लक्षणे दिसल्यास तात्काळ सिव्हील रुग्णालयातील दंत विभागाशी संपर्क साधावा. असं आवाहन डॉ. अर्चना पवार (दंत शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय ) यांनी केलं आहे.