ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: मेट्रो प्रकल्पाबाबत कारशेडसाठी मोघरपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. कारशेडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्याबाबत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. मोघरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनाने केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. वर्ग १ ची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासनस्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
मोघरपाडा कारशेडसाठी मानंमानी कारभार सुरु आहे अशी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कारशेडबाधित शेतकऱ्यांचा तीव्र संताप होत आहेत. याचपार्श्वभूमीवर मोघरपाडा येथील कारशेडबाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी आमदार संजय केळकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला. १६७ शेतकऱ्यांना मोबदला म्हणून ८० वर्षांच्या कराराने जमिनी न देता वर्ग १ च्या जमिनी देण्यात याव्यात, १४.४ टक्केसह दोन एफएसआय देण्यात यावा तसेच देण्यात येणाऱ्या जमिनीचा अधिकृत नकाशा आणि सातबारा देण्यात यावा, असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते. या मागण्यांची पूर्तता व्हावी, असे साकडे शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातले.
याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे केळकर म्हणाले. बाधित शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नसून त्यांना न्याय-हक्क हवा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून बाधित शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.