TMC Election 2026: ठाण्यात बिनविरोध उमेदवारांची चर्चा रंगली! ईव्हीएमवर नावं नसल्याने महापालिकेच्या आदेशाचे तीनतेरा
ठाणे महापालिकेत ३३ प्रभागांमध्ये निवडणूका पार पडत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ड्रामे, दावे – प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिका निवडणूकीत मनसे – शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवित आहेत. तर विरोधात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि रिपाई या पक्षांनी महायुतीची साथ दिली आहे. त्यामुळे ठाण्यामधील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे ईव्हीएम मशीनवर नसल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ज्यावेळी अर्जांची छानणी करण्यात आली तेव्हा काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. याशिवाय काही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना देखील घडल्या. तर या ठिकाणी काही अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले होते. यातील काही अर्ज माघार घेण्यात आले तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यानंतर शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. या संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.
राज्यातील विविध महापालिकांमध्ये आतापर्यंत ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा आदेश दिला होता. एखाद्या प्रभागात निवडणूक बिनविरोध झाली, तर त्या प्रभागाचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा आणि आयोगाची मान्यता मिळाल्यानंतरच निकाल जाहीर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
याच आदेशानुसार, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राज्य निवडणूक आयोगाचा पुढील निर्देश येईपर्यंत ईव्हीएम यंत्रावर दिसणार, असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनवर बिनविरोध उमेदवारांची नावेच दिसत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. कोणाला मतदान करायचे, याबाबत मतदार संभ्रमात पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. असाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतही पाहायला मिळाला. तेथेही ईव्हीएमवर नावे नसल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.






