एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारी देण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Jyoti Waghmare in Rajya Sabha : मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाने उमेदवार जाहीर न केल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान. एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी खेळून चर्चेत असलेल्या कोणत्याही उमेदवाराला संधी न देता थेट महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात जण जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या सहा उमेदवारांची निवड निश्चित आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. यामुळे उमेदवार जाहीर केले जात आहेत. भाजपने चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शिंदे गटाने एक आणि अजित पवार गटाने एक एक उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या प्रमुख वक्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका
शिवसेनेकडून राज्यसभेवर राहुल शेवाळे जातील अशी चर्चा होती. राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, विश्वासू मानले जातात. मात्र एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी धक्कातंत्र वापरुन त्यांना संधी न देता महिलेला संधी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी देण्यात आली. ज्योती वाघमारे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तडफदार तोफ म्हणून ओळखल्या जातात. आपल्या प्रभावी भाषणांमधून आणि सडतोड उत्तरांतून त्यांनी विरोधकांना गार केले आहे. यानंतर आता ज्योती वाघमारे या राज्यसभा गाजवणार आहेत.
हे देखील वाचा : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका
कोण आहे ज्योती वाघमारे?
डॉ. ज्योती वाघमारे या मुळच्या सोलापूरच्या असून त्यांची शैक्षणिक बाजू अत्यंत भक्कम आहे. इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी पीएचडी मिळवली आहे. अर्धमागधी या विषयात त्या राज्यामध्ये पहिल्या आल्या आहेत. महिलांच्या समस्येबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. ज्योती वाघमारे यांना केवळ मराठी नाही तर हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या भाषांची जाण आहे. आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या ज्योती वाघमारे यांनी संघर्षाच्या परिस्थितीतून राज्यसभेपर्यंत प्रवास केला आहे.






