मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत संपता संपता स्थायी समितीकडे आलेल्या प्रस्तावांपैकी १२३ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. यातील प्रस्तावांना प्रशासकांकडून टप्प्या – टप्प्याने मंजुरी दिली जात आहे. या आठवड्यात होणा-या बैठकीत आणखी ४० प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार प्रशासकांकडून चालवला जातो आहे. स्थायी समितीत मंजुरीविना राखून ठेवण्यात आलेले १२३ प्रस्तावांना प्रशासकांकडून टप्प्या- टप्प्याने मंजुरी दिली जाते आहे. या प्रस्तावांपैंकी सुमारे २५ प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी ४० प्रस्तावांना प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मान्यता दिली आहे. तर आणखी ४० प्रस्ताव सोमवारी होणा-या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.
स्थायी समितीत राखून ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी विलंब का केला जातो आहे, यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर प्रस्तावांच्या मंजुरीला वेग आला आहे. खर्चांच्या प्रस्तावांसह डी -विभागातील घास गल्लीतील यानगृहाच्या इमारतीची दुरुस्ती, पुढील दोन वर्षांमध्ये सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात येणारे पंप, शहरातील विद्यमान पुलांची रंगरंगोटी आदी ४० प्रस्तावांना गेल्या बुधवारी मंजुरी देण्यात आली. यात नायर दंत रुग्णालयाकरीता इलेक्ट्रीकली ऑपरेटेड डेंटल चेअर्स आणि युनिट यंत्राचा पुरवठा, बोमनजी पेटीट रस्त्यापासून उमर पार्कमधील आरसीसी पाईपची पर्जन्य जलवाहिनी टाकणे, पूर्वमुक्त मार्गावर बोगद्यापासून भक्ति पार्क दरम्यान खडबडीत काँक्रिट पॅचेस पुनर्वसन, पवई तलावातील कारंजांची देखभाल अशा महत्वाच्या ४० प्रस्तावांचाही यात समावेश आहे.
[read_also content=”मामानेच केला भाचीवर अत्याचार, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल; नराधम मामा फरार https://www.navarashtra.com/maharashtra/uncle-tortured-niece-filed-a-case-with-rural-police-naradham-mama-absconding-nrdm-270263.html”]
तर उर्वरीत प्रस्तावांपैकी आणखी ४० प्रस्तावही सोमवारी प्रशासकांच्या मंजुरीसाठी सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सादर होणा-या ४० सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास येत्या काही दिवसांत उर्वरित सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे स्थायी समितीने राखून ठेवलेले सर्वच प्रस्ताव लवकरच निकालात काढले जातील अशी चर्चा आहे.