"...म्हणून बंडखोरांना उमेदवारी दिली नाही", आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण (फोटो सौजन्य-X)
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहेत. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये एकूण २,७०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात असून स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोठ्या प्रमाणात बंडखोरांमुळे आदित्य ठाकरे यांचे लक्ष वरळी विधानसभा मतदारसंघावर आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील मुंबई महानगरपालिकेच्या १९३, १९६ आणि १९७ प्रभागांमध्ये बंडखोरी झाली असून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बंडखोरामुळे शिवसेना (ठाकरे) – मनसे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युतीची डोकेदुखी वाढली आहे.
वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासाठी वरळी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. विशेषतः माहीम आणि वरळी (आदित्य ठाकरे) विधानसभा मतदारसंघातील वॉर्डावर सर्वांचे लक्ष होते. वरळीतील वॉर्ड क्रमांक १९६ महिलांसाठी खुला झाल्याने विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले. या निर्णयामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटात नाराजी उफाळून आली आहे. तसेच वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी देण्यात आली.
एखादा पक्ष जिंकू शकतो किंवा त्या पक्षाच्या आधारे निवडणूक लढवता येते. अशा बंडखोरांना उबाठाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच वरळी विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांच्यावर बलात्काराची केस देखील दाखल होती, म्हणूनच अशा बंडखोरांना शिवसेनेकडून (उबाठा) कधीच उमेदवारीचं तिकीट मिळणार नाही,असं परखड मतं आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देण्यात व्यक्त केलं.
पक्षाने तिकीट कापल्याने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचा निर्णय घेतलाय. आमदार आदित्य ठाकरे यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसत आहे. जुने शिवसैनिक सूर्यकांत कोळींनी प्रभाग क्र. १९३ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मला उमेदवारी देणार हे ठरलेलं, मात्र शेवटच्या क्षणी नाकारण्यात आलं, असे कोळी म्हणाले. विजयी झाल्यास मातोश्रीवर जाऊनच गुलाल उधळणार, असे सूर्यकांत कोळींनी स्पष्ट केले.
दरम्यान, तिकीट वाटपानंतर निर्माण झालेल्या या असंतोषामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आदित्य ठाकरे ही नाराजी दूर करून परिस्थिती सावरतील का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






