संग्रहित फोटो
पंचवटी : दिंडोरी रोडवरील म्हसरूळ पोलिस चौकीसमोर एका खाजगी शाळेच्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात (School Bus Accident) झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकी यांचे नुकसान (Bus Loss) झाले. तसेच पादचारी मार्गावर फुल, कटलरी साहित्य विकणाऱ्यांची दुकाने बस खाली आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील एका खाजगी शाळेची बस बुधवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तीन ते चार शालेय बसेस विद्यार्थ्यांना घेऊन दिंडोरीरोडहून मार्गस्थ झाली. त्यातील बस (एमएच १५ जीएन ४२९१) च्या चालकास अचानक फिट आली. यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रिक्षास धक्का लागला. त्यानंतर शालेय बस ही महालक्ष्मी अपार्टमेंट समोरील बाजूस असलेल्या पादचारी मार्गावर चढली. त्यामुळे या ठिकाणी असलेली फुल, कटलरी, भाजीपाला असे चार ते पाच दुकानावर बस जाऊन थांबल्याने या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. यावेळी बसखाली येथे उभी असलेली दुचाकी देखील आली.
सुदैवाने जीवितहानी नाही
कडक ऊन असल्याने या ठिकाणी भाजीपाला, फुल, कटलरी साहित्य विकणारी मंडळी दुकानापासून दूर होती. यामुळे जीवितहानी टळली. या बसमध्ये खाजगी शाळेची लहान वयोगटातील जवळपास वीस ते बावीस विद्यार्थी होते. सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या ठिकाणी लागलीच म्हसरूळ येथील ग्रामस्थ तसेच नागरिकांनी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले आणि दुसऱ्या बसने घरी पाठवले. तसेच, फिट आलेल्या बस चालकास बाजूला बसवित त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.