इस्लामपूर : इस्लामपूर क्रिकेट असोसिएशन तर्फे सुरू असलेल्या ४० वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेत पेप्सी व जावडेकर स्पोर्ट्स मध्ये अंतिम लढत होणार आहे. आज झालेल्या उपांत्य लढती रोमहर्षक झाल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्पर्धेत दहा संघ साखळी पद्धतीने खेळत आहेत. उरण परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळत आहे.
१९९० च्या दशकातील इस्लामपूर शहरातील नामवंत संघानी आपले कौशल्य पणाला लावले.
आज झालेल्या उपांत्य लढतीमध्ये पेप्सी व जावडेकर स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी संघांच्या विरोधात विजय नोंदवले.
सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य लढतीमध्ये जावडेकर स्पोर्ट्स ने एम. डी. पवार स्पोर्ट्सवर २६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जावडेकर स्पोर्ट्सने ६६ धावा केल्या. सुनील शिंदे ( २४) शशिकांत सूर्यवंशी (१९) तर वीरेश देवळालकर यांनी ६ चेंडूत (१६ ) धावा केल्या. प्रतिस्पर्धी एम.डी पवार संघाला अवघ्या ४१ धावा करता आल्या. त्यांच्या विलास नाईक याने सर्वाधिक ( १३) धावा केल्या. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना वीरेश देवळालकर याने तीन विकेट मिळवल्या. तो सामनावीर ठरला. जहांगीर नरदेकर,मिलिंद कुंभार यांनी पंच म्हणून काम पाहिले.
जावडेकर स्पोर्ट्स ने एम.डी पवार संघाला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत जाताना त्यांनी साखळी फेरीत छत्रपती स्पोर्ट्स,शॉर्ट अँड टॉल स्पोर्ट्स, युनिटी व वाठारकर स्पोर्ट्स विरोधात विजय मिळवले.
दुपारच्या सत्रात झालेल्या पेप्सी विरुद्ध युनिटी स्पोर्ट्स च्या उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात युनिटी संघाने ६१ धावा केल्या. पेप्सी संघाने शेवटचा चेंडू राखून विजयासाठी असणारे ६१ धावांचे आव्हान सहज पार केले. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात रंगत आली.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी वैभव साबळे व पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते व जेष्ठ खेळाडू व पत्रकारांच्या उपस्थित झाले. यावेळी झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकारांच्या संघाने जेष्ठ खेळाडूच्या संघावर विजय मिळवला. पत्रकार धर्मवीर पाटील सामनावीर ठरले. तर संदीप माने हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. अंतिम सामन्या नंतर इस्लामपूर शहरातील क्रिकेटचे राष्ट्रीय खेळाडू, आजी-माजी खेळाडू व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येणार आहे.






