सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : बावधनमधील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात चर्चेत आलेले आयपीएस तसेच कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडे अतिरीक्त असलेला ‘कारागृह उप महानिरीक्षक’ पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यामुळे वैष्णवी आत्महत्या प्रकरण सुपेकर यांना भोवले असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. एकप्रकारे हा अतिरक्त कार्यभार काढून त्यांना गृहविभागाने दणका दिला आहे, असे बोलले जात आहे.
वैष्णवी हगवणे हिचे वडिल अनिल कस्पटे यांनी कारागृह विभागाचे ‘विशेष पोलीस महानिरीक्षक’ यांच्यावर आरोप केले होते. जालिंदर सुपेकर हे हगवणे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे पोलिसांवर एकप्रकारे सुपेकर यांचा दबाव होता, असा आरोप त्यांनी केला होता. त्यापुर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप केले होते. निलेश चव्हाणला पिस्तूल परवाना देखील त्यांनीच दिला असल्याचा आरोप आहे. तेव्हापासून सुपेकर चर्चेत आहेत. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील याबाबत विचारल्यानंतर त्यांनी गैर काही आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.
जालिंदर सुपेकर हे सध्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. तत्पुर्वी कारागृह विभागात कारागृह उप महानिरीक्षक ही राज्यात पाच पदे आहेत. दोन ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. तर नाशिक विभाग, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह येथील कारागृह उप महानिरीक्षक पद रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा अतिरीक्त कार्यभार सुपेकर यांच्याकडे देण्यात आलेला होता.
सुपेकर यांचे वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर गृहविभागाकडून पिस्तूल परवानाबाबत गुप्त चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता लागलीच सुपेकर यांच्याकडे असलेला नाशिक, संभाजीनगर व नागपूर मध्य कारागृह विभागाचा अतिरीक्त असलेला ‘कारागृह उप महानिरीक्षक’ पदाचा कार्यभार काढून घेतला आहे.
या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील कार्यभार काढून तो पुणे पश्चिम विभागाच्या कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे नागपूर पूर्व विभागाच्या कारागृह विभागाचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह विभागाच्या अधीक्षक अरूणा मुगुटराव यांच्याकडे नाशिक विभागाचा तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृह विभागाचे अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागाचा कारागृह उप महानिरीक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाचे सहसचिव सुग्रिव धपाटे यांनी काढले आहेत.