नवी मुंबईत पोलीस उपायुक्त 2 च्या कार्यालयाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
सावन वैश्य/नवी मुंबई:नवी मुंबई शहराचा वेगाने होत असलेला भौगोलिक विकास आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे येथील प्रशासकीय व पोलिसीय व्यवस्था अधिक सक्षम करणे ही काळाची गरज झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत तीन परिमंडळ स्थापन करण्यात आले असून, परिमंडळ दोनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नवी मुंबई हे शहर नियोजनबद्ध रितीने उभारले गेले असून आज ते महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक मानले जाते. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने, रस्ते, रेल्वे, शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्रे आणि आयटी पार्क यांच्या उपस्थितीमुळे या शहराने विशेष ओळख निर्माण केली आहे. याशिवाय आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ तसेच लवकरच कार्यान्वित होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पामुळे या शहराचे महत्त्व अनेकपटींनी वाढले आहे. सुनियोजित रस्ते, वसाहती आणि स्वच्छ वातावरण यामुळे हे शहर राहण्यासाठी नागरिकांच्या पसंतीत कायम अग्रस्थानी राहिले आहे.
Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…
या वाढत्या प्रगतीसोबतच नागरिकांची वाढती वस्ती आणि व्यापारी हालचालींमुळे कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवणे ही पोलीस दलासमोरील मोठी जबाबदारी आहे. शांतता, सुरक्षेची हमी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने तिसऱ्या परिमंडळाची स्थापना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिमंडळ दोनच्या कार्यालयाचे उद्घाटन आयुक्त मिलिंद भारंबे यांनी करून दिले.
हे कार्यालय एनआरआय पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आले आहे. परिमंडळ दोनमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सीबीडी व सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट या कार्यालयांचा समावेश आहे. तसेच नेरूळ, सीबीडी, एनआरआय सागरी, प्रस्तावित विमानतळ पोलिस ठाणे, उलवा, न्हावा शेवा, उरण व मोरा सागरी या एकूण आठ पोलीस ठाण्यांचा समावेश या परिमंडळात करण्यात आला आहे. यामुळे विस्तृत क्षेत्रावर पोलीस कारवाईची प्रभावी पकड राहणार आहे.
Jalna News: गोहत्या कधी थांबणार? अस्लम कुरेशीच्या ‘या’ कृत्यामुळे महाराष्ट्रातील जालन्यात तणाव
या नवनिर्मित परिमंडळ कार्यालयामुळे नागरिकांना पोलिसांचा अधिक त्वरित प्रतिसाद मिळेल, तसेच गुन्ह्यांचे तपास जलदगतीने होण्यास मदत होईल. विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे परिमंडळ अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या औद्योगिक व सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीही या कार्यालयाची मोलाची भूमिका राहणार आहे.
परिमंडळ दोनचे नवे उपायुक्त अमित काळे यांनी 24 जुलै रोजी पदभार स्वीकारला असून त्यांनी त्वरित कामकाजाला सुरुवात केली आहे. हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुले ठेवण्यात आले असून, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत नागरिकांना भेटण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल.
नवी मुंबई शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी या नवनिर्मित परिमंडळ कार्यालयाचा नक्कीच फायदा होणार असून, भविष्यात शहर अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पोलिस दलाची ताकद आणखी वाढली आहे, असे मानले जाते.