एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचं हत्यार उपसल्यानं लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे. यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात तब्बल १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आज कामगार संघटनांची बैठक आहे. या बैठकीनंतर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज (4 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यात मागण्यांवर चर्चा होईल. आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे.
मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संपकरी कामगारांना दिलासा देण्याचे आवाहन करतानाच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या मंगळवारी मुंबई दौऱ्यावर असल्याकारणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामध्ये व्यस्त होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी कर्मचारी संघटनांना त्यांच्या सह्याद्री किंवा शासकीय निवासस्थानी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यामधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “बैठकीत सकारात्मक चर्चा होईल गणेशोत्सव जवळ आला असल्याकारणानं अनेक नागरिक खरेदी-विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करत असतात. याकरता माझं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी संप करू नये. याबाबत सकारात्मक चर्चा करून आणि चर्चेतून प्रश्न सुटेल.” , अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली.
महामंडळाकडून कंत्राटी कर्मचारी नेमण्याची तयारी असतानाच राज्यात एसटी संपाची व्याप्ती सध्या वाढली आहे. एसटीच्या राज्यभरातील २५१ आगारांपैकी १०० आगार पूर्णतः बंद आहेत. ८२ आगार अंशतः सुरू आहेत. तर ६९ आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मराठवाडा २६ आगार पुर्णतः बंद तर खान्देशात ३२ आगार पुर्णतः बंद आहेत. यामुळे संपाची तीव्रता अधिक आहे. तर मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे.
मंगळवारी ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर …आज सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
सर्वाधिक गैरसोय आज जाणाऱ्या गणेश भक्तांची होऊ शकते. सुमारे १ हजार बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागातून आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. तसेच एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत आज बैठक होणार आहे.त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन ,चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतो. तरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे! प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.