पुणे : राज्यात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या राजकीय स्तरावर विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार शरद पवार यांनी लगेचच घेतला.
शरद पवार हे फडणवीसद्वेषी आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर आता शरद पवार म्हणाले, ‘मतदार कुठे गेले असतील, दुबईला गेले असतील, काठमांडूला गेले असतील, तर त्यांनी यावं असं आवाहन कुणी केलं तर त्यात चुकलं काय? उल्लेख केलेल लोक जर मतदार नसतील, तर त्याबद्दल हरकत घेण्याचं कारण होतं. पण आज त्यांच्या भाषणावर अशी हरकत घेणं हा कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचाच प्रयत्न आहे’. बावनकुळे यांच्या विधानावर पवार म्हणाले, ‘हे भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान बालीश आणि पोरकटपणाचं आहे. इतकी वर्ष भाजप नेत्यांना ओळखतो पण त्यांना मिठीमारण्यासारखे ते नाहीत’.
काय म्हणाले बावनकुळे?
शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते. पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. फडणवीस मुख्यमंत्री नको असल्याची भूमिका पवारांनी कायमचं मांडली आहे. कारण पवार हे फडणवीसद्वेषी आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अनेक नेतेमंडळी प्रचाराच्या मैदानात
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचारही चर्चेत आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज मंडळी प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.