वजराई धबधब्यावर थरार ठरू शकतो जीवासाठी घातक; प्रतिबंधित क्षेत्रात तरुणांची घुसखोरी
Pune News: भारतातील सर्वात उंच वजराई धबधब्यावर पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून काही उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून थेट धबधब्याच्या कड्यावर पोहोचत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रशासनाने स्पष्टपणे बंदी घातलेल्या या भागात काही तरुण जुन्या पायवाटेने घनदाट जंगलातून जाऊन थेट धबधबा कोसळतो तिथपर्यंत पोहचत आहेत.
भांबवली गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या सहकार्याने या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरच्या पायवाटेवर लाल दगड टाकून मजबूत मार्ग, बसण्यासाठी पॅगोडा आणि पायऱ्यांचा परिसर विकसित करण्यात आला आहे. मात्र, पायऱ्यांच्या शेवटी कुंपण घालून पुढील मार्ग बंद करण्यात आला आहे.तरीही काही तरुण जुनी पायवाट वापरून धोकादायक जंगलातून थेट धबधब्याजवळ जात आहेत. या भागात तीव्र उतार, खोल दऱ्या, विंचू, जळवा, जंगली प्राणी आणि दगड कोसळण्याचा धोका कायम आहे. यामुळे कोणताही अपघात घडल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो.
वनविभागाने प्रतिबंधित भागात जाणाऱ्यांवर ₹2000 दंडाची चेतावणी दिलेली असली तरी ती दुर्लक्षित केली जाते. काही वर्षांपूर्वी काही पर्यटक धबधब्याच्या नादात जंगलात हरवले होते, त्यांचा ठावठिकाणा दुसऱ्या दिवशी लागला होता. स्थानिक प्रशासन व व्यवस्थापन समितीने अनेकदा आवाहन करूनही काही पर्यटक या सूचना पाळत नाहीत. त्यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाले भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही नागरिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालतात.पुण्यात असाच प्रकार समोर आला असून, पावसाने तुडुंब भरलेल्या नदीपात्रात अंघोळ करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या तरुणांना दिलेल्या शिक्षेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचा अंदाज कायम असून, नद्यांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, फोटोग्राफी किंवा अंघोळीसारख्या कृती टाळाव्यात, असे आवाहन केले आहे.