संग्रहित फोटो
कागल : कागल विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती. या मतदारसंघात एकूण ८३ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर कागलसह बहुतांश मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. फायदा कोणाला होणार ? हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. गेल्या पंधरा दिवसात कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जावून आपल्या उमेदवाराची बाजू मांडून मतदारांना आपलेसे करण्यात यश मिळविले. मतदानाची वेळ संपताच कार्यकर्त्यांनी एकदाचे झाले मतदान म्हणत सुटकेचा निश्वास सोडला.
कागल विधानसभा मतदारसंघात नेहमीच अटीतटीच्या लढीतीने सर्वांंचेच लक्ष वेधले जाते. यावेळी दुरंगी लढतीने मतदारसंघात चांगलाच रंग भरला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या महिन्याभरात प्रचाराचे रान उठवले होते. त्यामुळे चुरस वाढून अटीतटीची लढत झाली.
सर्वच उमेदवारांनी आपआपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यानंतर मतदारसंघातील अनेक केंद्रांना त्यांनी दिवसभरात भेटी दिल्या व कार्यकर्त्यांना मतदानाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सतर्क राहून मतदान करुन घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे कागल तालुक्यात नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणे मतदान झाले. विशेष करुन तरुण कार्यकर्त्यांनी दिवसभर मतदारांना ने-आण करण्याचे काम केले. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४१:३६ टक्के , ३ वाजेपर्यंत ५८:७१ टक्के, मतदान झाले. सायंकाळच्या सत्रात पुन्हा मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७४:३४ टक्के मतदान झाले. राहिलेल्या मतदारांना अखेरच्या टप्यात मतदान केंद्रावर नेण्यासाठी कार्यवर्त्यांची चढाओढ सुरु होती. प्रत्येक मतदारावर या कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष होते.
हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण
कागल गडहिंग्लज उत्तुर मतदार संघात ८३ टक्के मतदान
२०२४ मध्ये कागल गडहिंग्लज उत्तुर मतदार संघात एकूण ३ लाख ४३ हजार ६७२ इतके मतदार आहेत. त्यापैकी ..२ लाख ८३ हजार ५६८ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८३ टक्के इतके मतदान झाले. ते पूर्ण मतदार संघात इर्षेने झाल्याने याचा फायदा किंवा फटका कोणाला बसेल.हे २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष बघायला मिळाला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सभा घेतल्या. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यभरात सभा घेतल्या. या निवडणुकीत शरद पवार अतिशय आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी संपूर्ण राज्य पिंजून काढत झुंजारपणे प्रचार केला.