'..तर सोबत राहण्याचा काहीच अर्थ नाही'; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
Uddhav Thackeray News: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या समन्वयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने चांगली कामगिरी केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील विलंबामुळे पराभव पत्करावा लागला, आपल्याला चुका दुरुस्त कराव्या लागतील. भविष्यात अशा चुका होत राहिल्या तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही.” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
ज्या चुका विधानसभेत झाल्या, त्या जर पुन्हा झाल्या तर महाविकास आघाडीची प्रासंगिकताच काय राहील? ” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्याबद्दल खेद व्यक्त केला. “ह्या जागा शिवसेनेने याआधी अनेक वेळा जिंकलेल्या होत्या, तरी त्या सोडाव्या लागल्या. पण आगामी निवडणुकीत पक्षनिष्ठा आणि ताकदीचा आदर राखला गेला पाहिजे.
“लोकसभा निवडणुकीनंतरचा एकत्रित लढ्याचा उत्साह हा विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक अहंकारात रूपांतरित झाला, आणि त्याचा फटका सगळ्यांना बसला,”असे म्हणत ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यापुढे अधिक जबाबदारीने काम करावे, असा संदेश दिला. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीदरम्यान सवलती जाहीर करण्याच्या शर्यतीत एकमेकांशी स्पर्धा सुरू झाली, ज्याचा फटका संपूर्ण आघाडीला बसला. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. आता पुढील निवडणुकांपूर्वी ही आघाडी स्वतःमधील विसंवाद कसा मिटवते, आणि एकसंघ लढण्यासाठी कोणते धोरण आखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्यालाही आपल्या चुका स्वीकाराव्या लागतील – ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान ‘लाडकी बहीण योजने’ सारख्या आश्वासनांमुळे जनतेला गोंधळून गेली होती. पण महाविकास आघाडीचे नुकसान झाले. त्यांनी ईव्हीएम घोटाळा, बनावट मतदार यादी आणि मतदार संख्येत अचानक वाढ यासारख्या मुद्देही नंतर समोर आले. परंतु केवळ सबबी किंवा कारणे न सांगता तर स्वतःच्या चुकाही स्वीकाराव्या लागतील.” असे ते म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. परंतु पाच महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) दणदणीत विजय मिळवला. विधानसभेतील २८८ जागांपैकी भाजपला १३२, शिंदे गटाच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्याच वेळी, विरोधी महाविकास आघाडीला एकूण ४६ जागा मिळाल्या, ज्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला २०, शरद पवार गटाला १६ आणि काँग्रेसला १० जागा मिळाल्या.