बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बससेवांचा तुटवडा
पंढरपूर : शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यातच तालुक्यात विवाह सोहळ्याची धूम आहे. परिणामी, तालुक्यातील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेषतः पंढरपूर बसस्थानकावर गत दोन महिन्यांपासून गर्दी होत आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून अनेक ग्रामीण भागात बसगाड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता बससेवा वाढविण्याची मागणी होत आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची, तर नातेवाईक, मित्रमंडळींची विवाहकार्यासाठी जाण्यासाठी लगबग सुरु आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व्यवस्थेवर ताण वाढला आहे. पंढरपूर बसस्थानकात दररोज सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होत आहे. अनेकदा नागरिकांना बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहेे. बस न मिळाल्यास तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. बसेसच्या पुढे खासगी वाहने धावायची. परंतु, आता खासगी अवैध प्रवाशी वाहतूक बंद पडली आहे.
ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस दिवसभरात ठराविकच वेळा चालविल्या जातात. तुरळक बसफेऱ्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस न मिळाल्यास दुसऱ्या फेरीसाठी अनेक तास थांबावे लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे.
खासगी वाहनांकडे प्रवाशांची पाठ
चार वर्षांपूर्वी तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतुकीचे लोण गाव-खेड्यापर्यंत पसरले होते. यातून अनेक बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हायच्या. परंतु, यामुळे बससेवा अडचणीत सापडली होती. परंतु प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे वळला असून, खासगी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
वाढीव बसफेऱ्या शहरांपुरत्या
पंढरपूर आगारांमधून बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच गर्दीमुळे होणारी गैरसोय थांबविण्यासाठी पंढरपूर विभागाने १ मेपासून अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. पंढरपूर बसस्थानकांवरून अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, बहुतेक बसेस शहरांपुरत्या मर्यादित असल्याने ग्रामीणांची गैरसोय होत आहे.
रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे
रिक्षाचालकांकडून वाजवीपेक्षा अधिक, अनेकदा मनमर्जीने भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसतो आहे. अशा स्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांसाठी ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत, अमृत योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकही बसचा पर्याय स्वीकारत असल्याने गर्दीत वाढ झाली आहे.