फोटो - टीम नवराष्ट्र
कर्जत : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे निवडणूकीसाठी वातावरण निर्मिती सुरु असून प्रचार देखील केला जात आहे. अद्याप निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला नसला तरी अंतर्गत कलह आणि पक्षप्रवेश वाढले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गट देखील शिवस्वराज्य यात्रेमधून तर अझित पवार जनसन्मान यात्रेमधून जोरदार प्रचार करत आहेत. मात्र आता आमदार रोहित पवार यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार यांची राजकीय भविष्यवाणी
रोहित पवार यांनी काही राजकीय भविष्यवाणी केली आहे. त्यांनी राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. लवकरच अजित पवार आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही भाजपाची रणनीती असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.
गुलाबी यात्रेत वेगळी भूमिका
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीचे नेते मतं खाण्यासठी काही पक्षांना उभं करतात. तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनिती आहे. अजित दादांच्या भूमिकेवरून वाटतं की, ते तिसरी आघाडी करतील तर या तिसऱ्या आघाडीत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष देखील असण्याची आहे. या तिसऱ्या आघाडीचं काम मते खायची असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेतायेत. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीत मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील, असे राजकीय भवितव्य रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांचे युतीचे राजकारण
अजित पवार यांनी 2019 साली निवडणूक पार पडल्यानंतर पक्षामध्ये वेगळी भूमिका घेतली होती. शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन नाराजी असल्यामुळे बोलणी विस्कटली होती. त्यामुळे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी उरकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार मागे फिरले. यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस अशी युती निर्माण झाली. त्यानंतर शिंदे गटाने पक्षात बंड पुकारत महायुती तयार केली. यामध्ये अजित पवार देखील सामील झाले. यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार तिसरी आघाडी निर्माण करतील असे भवितव्य रोहित पवार यांनी केले आहे.