मुंबई – ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सोमवारी उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयागाने शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह दिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिमानाने लढू आणि जिंकू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन गटात मशाल विरुद्ध तळपता सूर्य असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले. मात्र, शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज सकाळपर्यंत नवीन चिन्हाचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले होते.