पुणे : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली. मतदारांनी सकाळी सकाळी मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदान प्रक्रियेत भाग घेतला. कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदारांनी हक्क बजावला. ही आकडेवारी सायंकाळी पाचपर्यंतची आहे. 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. कसब्यात हजारो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पण चर्चा खासदार गिरीश बापट यांची सुरु आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आज मतदानास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार असून, 270 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 250 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी 10 याप्रमाणे 27 टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. पण चर्चा आहे ती आजारी असूनही ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.
प्रचारापासून होते दूर
कसबा विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बापट हे प्रकृती ठीक नसल्याने या पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहिले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने भाजपकडून ही जागा कायम राखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करण्यावर भर दिला गेला होता.