नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई
पहिले पथक उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, गणेश वराडे, कृष्ण कोकाटे आणि प्रशांत सहाणे यांचा समावेश आहे. दुसरे पथक उपनिरीक्षक दादा गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असून, पोलीस हवालदार हरीश आव्हाड, भारत पवार, रवींद्र चीने आणि प्रमोद साळवे हे कर्मचारी या पथकात आहेत. या पथकांनी सिन्नर शहरातील वावीवेस, शिवाजीनगर, सरदवाडी रोड, देवी रोड, बाजारपेठ परिसरातील पतंग विक्रेत्यांची दुकाने तपासली. तपासणीदरम्यान अवैध नायलॉन मांजा साठवणूक किंवा विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या इसमांवरही कोणतीही तडजोड न करता गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. विशेष म्हणजे नायलॉन मांजाचा वापर करणारा अल्पवयीन आढळल्यास संबंधित पालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील गल्लोगल्ली, वसाहती, छतांवर तसेच मोकळ्या मैदानात पोलिसांची कडक नजर राहणार असून, संक्रांतीच्या दिवशीसुद्धा विशेष पथके तैनात राहून कारवाई करणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाच्या बाबतीत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कागदी अथवा सुती मांजाच वापरावा आणि अवैध नायलॉन मांजाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सिन्नर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सिन्नर पोलिसांनी अवैध नायलॉन तरुणावर गुप्त बातमीच्या आधारे शनिवारी (दि. १०) धडक कारवाई कैली. या कारवाईत शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या मार्ग राहणारा ओंकार नितीन खत्री यास ताब्यात घेत ११, २०० रुपये किमतीचे १४ नायलॉन मांजाचे रिक जप्त करण्यात आले, संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भामरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, संदीप शिंदे तसेच शोचपथकातील नितीन डावखर, आप्पासाहेब काकड, समाधान बोराडे यांनी तत्काळ छापा टाकला. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल इंगोले करीत आहेत, ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या सूचनांनुसार सिन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली, पोलिसांनी नागरिकाना आवाहन केले आहे की, अवैध नायलॉन मांजाविषयी कोणालाही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखाली जाईल.
येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपदार वस्ती परिसरात धाड टाकून नायलॉन मांजाचे सुमारे ५२ हजार रुपयांचे १०४ रीळ जप्त केले आहेत. याप्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजहर सलीम चोपदार यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून विशेष पथकासह छापा टाकला. आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आणखी कोणी व्यक्ती विक्री किंवा साठवणुकीत सामील आहे का, याचा तपास सुरू आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली. नागरिकांनी अशा बेकायदेशीर विक्रेत्यांची माहिती देण्याचे आवाहनही येवला शहर पोलिसांनी केले आहे.






