अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका
महाजन म्हणाले की, काल शिवतीर्थावर कौटुंबिक सोहळा झाला. त्यात राज ठाकरेंचे भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा उत्तम नमुना होता. कालच्या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचे केलेले काम निंदनीय असल्याचे ते म्हणाले. घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी केलेला हा खटाटोप होता, असा घणाघात महाजन यांनी ठाकरेंवर केला. राज ठाकरे भाषणात अदानींवर घसरले, अशी टीका महाजन यांनी केले. जे अदानी शरद पवारांना मार्गदर्शक मानतात. अदानी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी भोजनासाठी जातात. मग राज ठाकरेंनी अदानींवर केलेली टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल महाजन यांनी यावेळी केला. अदानींनी मागील १०-१२ वर्षात प्रगती केली, या राज ठाकरेंच्या दाव्यावर महाजन म्हणाले की राज यांच्या मातोश्री बिल्डरची प्रगती केव्हा झाली. तो त्यांनी आठवायला हवा. युतीची सत्ता असताना मातोश्री बिल्डरची प्रगती झाली. त्यावेळेस राज यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणले होते. पंचवीस वर्षात तुमची किती प्रगती झाली याचं राज ठाकरेंनी स्मरण करायला हवं, असे महाजन म्हणाले.
उबाठा मनसे जागा वाटपात संदीप देशापांडेला सोबत घेऊ नका अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती, मात्र काल संदीप देशपांडे यांना भाषणाची संधी देणं हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड असल्याचे महाजन म्हणाले. संदीप देशांपाडे याने कालच्या भाषणा ठाकरे ब्रॅंड नाही असे म्हटलं नंतर तो ब्रॅंड नाही तर विचार आहे, असे सांगून देशपांडेने सारवासारव केली, असे महाजन म्हणाले. महापालिका निवडणुकीत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रॅंडचा नसून विचारांचा आहे, अशी मखलाशी देशपांडेने केल्याचे महाजन म्हणाले. मराठी माणसांची काळजी घ्यायला देवेंद्र फडणवी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे असे अनेक नेते आहेत. ठाकरेंकडे मराठी माणसाचा ठेका दिलेला नाही, अशी टीका महाजन यांनी केली.






