File Photo : Man Drowned
अमरावती : संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामध्ये तीन जण वाहून गेले. यामध्ये दोन जणांचा मृतदेह (Two Peoples Drowned in Water) सापडला असून, एका व्यक्तीचा शोध आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी घेत आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील महिला मांडू नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. लक्ष्मी अजय उबणारे (37, रा. सालबर्डी), असे मृत महिलेचे नाव आहे. लक्ष्मी अजय उबणारे ही महिला काही कामानिमित्त सकाळी दहा वाजता दरम्यान घरून निघाली. त्यानंतर ती मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या मांडू नदीच्या पात्राजवळ पाय घसरून पडल्याने पाणी प्रवाहात वाहून गेली. त्यावेळी आकाश झोड नामक युवकाने नदीपात्रात उडी घेऊन महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
या घटनेची माहिती सालबर्डीचे पोलिस पाटील सादिक पटेल यांनी दूरध्वनीवरून मोर्शी पोलिसांना दिली. त्यानंतर मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पंकज साबळे व वागतकर घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर पार्थिक नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शेतकरी गेला नाल्यात वाहून
शनिवारी दुपारी 12 वाजता दरम्यान शेतातून घरी परतत अचानक लेंडी नाल्याला पूर आला आणि या पुराच्या पाणी प्रवाहात 34 वर्षीय शेतकरी वाहून गेल्याची घटना तालुक्यातील जळका पटाचे येथे घडली. उमेश मारोती मोडक असे मृताचे नाव आहे. उमेश हा आपल्या वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. तो पिकाची पाहणी करण्यासाठी 11 वाजता गेला होता. त्यानंतर घरी परत जात असताना तो लेंडी नाल्याच्या पुरात वाहून गेला. त्यानंतर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.