माळशिरस : वेळापूर (ता. माळशिरस) येथील बस स्थानक चौकात गर्दी असताना तरूणावर गोळीबार केल्याचा थरार शुक्रवारी रात्री साडे सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला. तरूणाच्या कमरेला गोळी लागून तो जखमी झाल्यावरही पळत पोलिस ठाण्यात आला. या तरूणावर आरोपीने या पुर्वीही गोळीबाराचा प्रयत्न केला होता. सुमारे वर्षभरात गोळीबाराची ही पाचवी घटना असल्याने वेळापूरवासीय हादरले असून, गावठी पिस्तुले आणतात कोठून? असा सवाल निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक पांडुरंग शिंदे हे शुक्रवारी (दि. ३१ मे) रात्री साडेसात-आठ वाजताच्या दरम्यान वेळापूर बस स्थानकाच्या समोरून त्यांच्या बुलेटवरून घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अवधूत शेंडगे, अनिल शेंडगे, सागर शेंडगे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी बुलेटपुढे कार आडवी घातली. त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शिंदे वयांच्या डाव्या बाजूला कमरेच्या खाली लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
चारचाकी गाडीसह आरोपी ताब्यात
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अवधूत शेंडगे याने गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी गाडीसह पिस्तुल वेळापूर पोलीस ठाण्याचे सपोनी भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले आहे.
गोळीबाराचा थरार आणि पुनरावृत्ती
शेडगे आणि शिंदे यांचे भांडण झाले होते. त्यात शेडगेने शिंदेला मारहाण केली होती. त्याची फिर्याद शिंदेने पोलिसांत दिली होती. पोलिसांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे -शेडगे यांच्यात संघर्ष उडाला. शिंदेवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिस योगायोगाने आले. त्यांनी शेडगेला पाठलाग करून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
गोळीबाराच्या पाच घटना
या भागात गोळीबाराच्या वर्षभरात पाच घटना घडल्या आहेत. हे सर्व प्रकार गावठी पिस्तुलातून घडले आहेत. त्यामुळे एवढी पिस्तुले कोठून मिळतात? या भागात कोणी या व्यवसायात आहेत का? या पिस्तूल विक्रेत्याला पोलिस शोधणार का?किती पिस्तूल या भागात आहेत? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.