सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिरोळ : शेतातील केळी काढण्यासाठी अकिवाट येथे पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून सात जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आपत्तीकालीन विभागाचे कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणेने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बस्तवाड आकिवाट मार्गावर धरण पूल असून या पुलावरून सकाळी नऊ वाजता शेतातील केळी काढण्यासाठी एका ट्रॅक्टरमध्ये बसून सात जण निघाले होते. नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आला असता पाण्याला ओढ असल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून नदीपात्राच्या दिशेने सरकू लागला यादरम्यान ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीच्या पात्रात उलटला.
यामध्ये असलेले सात जण वाहून गेले आहेत. यातील दोघांना रेस्क्यू फोर्सच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अन्य पाच जण बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच बस्तवाड किंवा परिसरातील नागरिकांनी नदी किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर शासकीय यंत्रणा जलद गतीने कामाला लागल्यामुळे शोध मोहीम सुरू केले आहे. मात्र अद्याप बेपत्ता झालेल्यांचा शोध लागलेला नाही. यांत्रिक बोटीच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली आहे.