'महाराष्ट्र निवडणुकीत मतचोरी कशी झाली?' या माहितीपटाची लिंक पाठवण्यास TRAI चा नकार
गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये मतचोरी कशी झाली. निवडणूक आयोगाने मतचोरी कशी केली, यावर काँग्रेसकडून एक माहितीपट बनवण्यात आला आहे. पण महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना माहितीपटाची लिंक असलेले एसएमएस पाठविण्याचा काँग्रेसचा अर्ज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) फेटाळला आहे. “निषेधांशी संबंधित साहित्य” या कारणावरून हा अर्ज नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीपट महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कशा “चोरल्या गेल्या” यावर आधारित असून, तो पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ट्रायच्या नकारामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
Nashik Crime : सावकारांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कामगाराची आत्महत्या, काही रक्कम परत करूनही
काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी सांगितले की, पक्षाने “हाऊ द महाराष्ट्र 2024 इलेक्शन वॉज स्टोल” या युट्यूब माहितीपटाची लिंक एसएमएसद्वारे कार्यकर्त्यांना पाठविण्याची योजना आखली होती. त्यासाठी ट्रायकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता; मात्र तो नाकारण्यात आला.
चक्रवर्ती यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विचारले की, “माहिती दडपण्यासाठी गृह मंत्रालय, निवडणूक आयोग आणि दूरसंचार नियामक यांच्यात इतका परिपूर्ण समन्वय कसा असू शकतो?” तसेच त्यांनी अधिकाऱ्यांनी पाठवलेला संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर करून सरकारवर माहिती लपवण्याचा आरोप केला.
या संदर्भात काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील व्हीप माणिकम टागोर यांनीही ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली. “गृह मंत्रालय देखरेख करत आहे, दूरसंचार मंत्रालय संप्रेषण रोखत आहे आणि निवडणूक आयोग मूक प्रेक्षक आहे. हे सर्व महाराष्ट्र 2024 निवडणूक घोटाळा लपवण्यासाठी चालले आहे,” असे ते म्हणाले.
टागोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट लक्ष्य करत विचारले की, “जर महाराष्ट्र निवडणुका चोरीला गेल्या नसतील, तर तुम्ही YouTube लिंकला का घाबरत आहात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांवर TRAI कडून त्वरित कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.