रामदास तडस यांना दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने अखेर मागितली माफी (File Photo : Ramdas Tadas)
वर्धा : रामजन्माचा सोहळा चैतन्यमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. मात्र, त्यावेळी वर्ध्यात रामनवमीच्या कार्यक्रमातच माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर आली होती. यावरून वादंगही झाला होता. मंदिर प्रशासन आणि तडस यांच्या शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती समोर आली होती. यानंतर आता मंदिर प्रशासनाने माफी मागितली आहे.
रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली आहे. वर्धाच्या देवळी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तडस यांना श्रीरामाचे दर्शन नाकारले होते. सोहळे व जानवे परिधान केले नसल्याने त्यांना मंदिरात दर्शन नाकारले होते. पुरोगामी महाराष्ट्रात रामाचे दर्शन नाकारल्याने जिल्हाभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ज्यांनी दर्शन नाकारले ते पुजारी ट्रस्टी आणि श्रीराम मंदिर कमिटी माफी मागण्यासाठी रामदास तडस यांच्याकडे आले होते.
दरम्यान, माफी मागायला आलेल्या श्रीराम मंदिराचे शिष्टमंडळ तसेच रामदास तडस यांच्याशी देवळीतील इनडोअर स्टेडियममध्ये चर्चा झाली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तडस यांची माफी मागितली.
रामदास तडस यांची पुजाऱ्यांवर टीका
या शाब्दिक चकमकीनंतर तडस यांनी पुजाऱ्यांवर टीका केली होती. ते म्हणाले, ‘राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी दिवसभराच्या कार्यक्रमाला जात असतो. पण यावर्षी आम्ही राम मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याने अडवलं. संबंधित पुजारी हाच मंदिराचा ट्रस्टी आहे. तो पुण्याला राहतो. फक्त रामनवनीच्या दिवशी मंदिरात येतो. आम्ही वर्षानुवर्षे या मंदिरात जात असल्याने आमची रामावर आस्था आहे. पण पुजाऱ्यांनी हे काय सोवळे-ओवळे लावले आहे? तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता हे बरे नव्हे’, असे रामदास तडस यांनी म्हटले होते.