अलिबाग- भारत रांजणकर /विजय काते : शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांचे बॅरिकेड तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. जवळपास तास दीड तास पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू राहिली.हा मोर्चा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रसाद भोईर, दिपश्री पोटफोडे, शिरीष घरत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे व चिखल साचल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.
मोर्चात सहभागी शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत स्थानिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर पोलिसांनी बॅरिकेड उभारून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांचा कडोबा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये देखील ठाकरे गटाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या बेजबाबदार आणि गैरजबाबदार वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी मीरा-भाईंदर शहरातही आंदोलन करण्यात आले.तहसीलदार कार्यालय, टेंबा हॉस्पिटलजवळ, भाईंदर पश्चिम येथे ठाकरे गटाने आंदोलन केले . पथनाट्याच्या माध्यमातून मंत्र्यांच्या विविध वादग्रस्त कारनाम्यांवर प्रकाश टाकण्यात आला. पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री, हाती सिगारेट धरलेला मंत्री, तसेच पैशांनी भरलेली बॅग घेऊन फिरणारा मंत्री अशा प्रतिकात्मक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
आंदोलनादरम्यान मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करण्यात आली. या वेगळ्या आंदोलनामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले.शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जनतेच्या पैशांचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्या मंत्र्यांना आता गप बसू देणार नाही. राज्यभर उभा राहिलेला जनअक्रोश सरकारला धडा शिकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.