रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदरासंघामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नारायण राणे यांचा विजय झाला असून यानंतर आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र डागलं. महायुतीमध्ये असणारे व शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याविरोधात त्यांनी वक्तव्य केले होते. यावर उदय सामंत यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले असून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. पण त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना देखील इशारा दिला होता. उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांना कमी मतं मिळाली असे म्हणत राणे कधीही माफ करत नाहीत असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता. त्याआधी आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार
भाजप नेते नितेश राणे यांच्या या आरोपावर उदय सामंत यांच्याकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उदय सामंत म्हणाले, माझ्या मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते. त्यामुळें कदाचित त्यांनी ही नाराजगी मतांच्या स्वरूपात दाखवली. त्यानंतर ही नाराजगी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो. मात्र सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम करत नारायण राणेंना निवडून दिलं. नारायण राणे यांच्या बाबतीत कोणीही वेगळं काम केलेलं नाही. त्यांना 75 हजार मतांपर्यंत आम्ही पोहचवलं हे नारायण राणेंना माहीत आहे. मात्र असं असताना देखील माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याबाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुध्दा याबाबतीत माहिती घेतली पाहिजे, असे चोख उत्तर उदय सामंत यांनी दिले आहे.
महायुतीमध्ये वादाची ठिणगी
पुढे त्यांनी नितेश राणे यांच्या मतदारसंघाच्या दाव्यावर देखील उत्तर दिले. उदय सामंत म्हणाले, मी प्रचारात कमी पडलो असेल तर ते सुद्धा दाखवून द्या. निलेश राणे यांच्यावर आक्षेप घेणे हे लोकशाही नुसार चुकीचे आहे. परंतु आमचा मतदारसंघ मागितल्यानंतर आता निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर महायुतीमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत महायुतीच्या नेत्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे.”असे थेट उत्तर उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधीच राणे कुटुंब व उदय सामंत यांच्यामध्ये मतभेद सुरु झाले आहे.