कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी (फोटो सौजन्य-X)
कर्जत: केंद्र सरकारने जनसुरक्षा कायदा संमत केला आहे. हा कायदा घटनाविरोधी आणि संविधानाच्या विरोधात जाऊन संमत केल्याची भावना विरोधी पक्षांची आहे.या कायद्याला विरोध करण्यासाठी कर्जत तालुक्यात या कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
कर्जत तालुक्यात आदिवासी आणि दिनदूबळ्या लोकांसाठी काम करणाऱ्या जागृत कष्टकरी संघटना यांनी जनसुरक्षा कायद्याचा विरोधात आंदोलन पुकारले होते.जागृत कष्टकरी संघटना यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारने लादलेल्या जनसुरक्षा कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह अनेक स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या.कर्जत शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
जागृत कष्टकरी संघटना प्रमुख नॅनसी गायकवाड,सचिव अनिल सोनवणे,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस तानाजी मते,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक,कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष गोपाल शेळके तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय गवळी, जिल्हा उपाध्यक्ष दिनानाथ देशमुख आदी सह डॉक्टर सेल चे जिल्हा अध्यक्ष डॉ सदावर्ते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी शेकापचे तानाजी मते यांनी आपल्या सर्वांना आपले हक्क हिरावून घेणाऱ्या जनसुरक्षा कायद्याचा विरोधात एकत्र येण्याची गरज आहे.सर्वांनी केवळ एकदा आंदोलन करून चालणार नाही तर एकत्र येऊन या कायद्याला विरोध करावा लागेल असे मत मांडले.
काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनानाथ देशमुख यांनी भाजपने देशाचे ७० वर्षांपूर्वीचे कायदे मोडीत काढण्याचा धडाका उठवला आहे.देशाचे संविधान धोक्यात आणतील असे कृत्य भाजप प्रणित सरकार करीत असून हे सरकार विरोधी पक्षाची कोणतेही भूमिका ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही.त्यामुळे कर्जत तालुक्यात जागृत कष्टकरी संघटना यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता हा कायदा रद्द झाल्याशिवाय होऊ नये आणि त्यासाठी सर्व समाविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज देशमुख यांनी बोलून दाखवलं.