Uddhav Thackeray : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जोरदार चिखलफेक झाली. आता उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबियांचा वाद महाराष्ट्राला नवा नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असतात. तर ठाकरेंकडून राणेंच्या टीकेला खासदार संजय राऊत उत्तर देत असतात. आता तर उद्धव ठाकरे भाजपात येणार असल्याचे पुरावे देतो म्हटलेयं.
रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत नितेश राणेंचा मोठा दावा
आता आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरीतील एका पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघणार आहे. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना पुन्हा एनडीएमध्ये यायचे आहे. आणि ते यासाठी काय काय करत आहेत याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहेत.
सांगलीच्या जागेवरून जो राडा झाला त्यावरून
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीसमोर नाक रगडतात आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. लोकसभा निवडणुकी दरम्यान सांगलीच्या जागेवरून जो राडा झाला त्यावरून ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
ठाकरे एनडीएला बिनशर्त पाठिंबा देतो असे म्हणाले
नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची एनडीएमध्ये येण्यासाठी कोणाबरोबर बैठक झाली याचे त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे म्हटले आहे. तसेच, ठाकरे एनडीएला बिनशर्त पाठिंबा देतो म्हणल्याचा दावा राणेंनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 48 जागांवर पाच टप्प्यांत मतदान झाले. 1 जून रोजी देशातील सर्वच जागांवरील मतदान संपले असून, चार जून रोजी निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये पक्ष फुटूनही उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत नाही. अनेक पोल्सनी ठाकरे यांचा पक्ष राज्यात दोन नंबरच्या जागा जिंकेल असा दावा केला आहे.