पुण्यातील राजकीय वाद तापला (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
पुणे: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. साेडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर खापर फाेडले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने या पाचही जागा महापािलकेच्या निवडणुकीत आमच्या वाट्याला हव्यात, अशी मागणी केली आहे.
पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद बाहेर पडू लागली आहे. माजी पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यापार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनावडे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करीत, माझी शिवसेना , उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. गेल्या पाच वर्षांत पक्ष वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाही. नगरसेवकांची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांच्याच पायात पाय घालण्याचा प्रकार सुरु आहे. ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी टिका धनावडे यांनी केली आहे.
धनावडे यांनी केलेल्या टिकेला शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. थरकुडे म्हणाले, पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात किती बैठका घेतल्या तसेच शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे त्यांना विचारण्याची आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा: Pune Collector: पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची बदली, आता ‘हे’ असणार नवे कलेक्टर
शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक
ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये जाणाऱ्या पाचही जागा या महायुतीच्या जागा वाटपात अामच्या पक्षाला मिळाव्यात अशी भुमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतली अाहे. यासंदर्भात शहर प्रमुख प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे यांनी पत्रकार परीषदेत भुमिका जाहीर केली. यामुळे पुढील काळात जागा वाटपात या जागा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली अाहे. पत्रकार परीषदेला शिवसेनेचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते. तर भाजपकडून या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा अथवा माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले.
‘त्या’ जागा आम्हीच लढविणार
भानगिरे म्हणाले की, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून काम केले. गेल्या अडीच वर्षात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. या दोन्ही निवडणूकांंमध्ये ज्यांचा विद्यमान खासदार, आमदार ती जागा त्या पक्षाची असे जागा वाटपाचे सूत्र होते. हेच सूत्र महापालिका निवडणूकांमध्येही कायम असणार आहे. त्यामुळे, २०१७ मध्ये तत्कालीन शिवसेनेने लढविलेल्या जागा आम्ही लढविणार आहोत. जे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत त्या जागा ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे या जागा शिवसेनेच्या असून या जागा आम्हीच लढविणार असल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे.