Devendra Fadnavis News: “राजकारणाच्या नावाखाली बेशिस्त वर्तन करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मालेगाव स्फोट प्रकरण, भगवा आतंकवादाचा कथित नरेटिव्ह, आणि मंत्रिमंडळातील खात्यांमध्ये झालेल्या बदलावर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना पुन्हा इशारा दिला आहे. त्याचवेळी त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावरही भाष्य केलं आहे.
मालेगाव स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “मालेगाव खटल्याच्या निकालानंतर काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा नवा नरेटिव्ह तयार केला गेला. 1990 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीस संपूर्ण जगात इस्लामिक दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी हिंदूंना लक्ष्य केले. यूपीए सरकारच्या काळात मुस्लिमांना आतंकवादी ठरवलं जातंय, असा आरोप होऊ नये म्हणून काँग्रेसने कट रचत हिंदू संघटनांना आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांवर दबाव टाकून अटकसत्र राबवण्यात आलं. मात्र, कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही,” असे फडणवीस यांनी नमूद केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “चव्हाण यांनी आधी त्यांच्या सहकाऱ्यांना विचारावं, कारण ज्या यूपीए सरकारचा ते भाग होते, त्याच सरकारने ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. आता मात्र त्यांना शिवाजी महाराजांचा भगवा आठवतोय. “भगवा, हिंदू, सनात हे सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्याबदलाबाबत फडणवीस म्हणाले, “संबंधित घटनेमुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना दुसरे खाते देण्यात आले असून, कृषी खाते आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत. मात्र, आपलं वर्तन, भाषा आणि आचारधारा यावर जनता सतत लक्ष ठेवून असते. त्यामुळे बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. गरज पडल्यास कारवाई केली जाईल.” असा इशाराही त्यांनी दिला आहे.