वसई /रविंद्र माने : मेल्यानंतर स्वर्ग दिसतो अशी म्हण आहे मात्र त्यासाठी मेल्यानंतरही संघर्ष कायम सुरु आहे. ऐन पावसाळ्यात स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रेतांच्या अंत्यविधीसाठीदेखील कुटुंबियांना अवहेलना सोसावी लागत आहे. नागरिकांचा इतका त्रास सोसावा लागत असून देखील पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसून आहे.
उघड्यावर खितपत पडलेल्या स्मशानातील लाकडे पावसात भिजत असल्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना पेल्हार येथील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.वसईच्या पूर्वेकडील पेल्हार येथे असलेली हिंदू स्मशानभूमी वनविभागाच्या अखत्यारित येते.
मात्र,वनविभाग आणि वसई-विरार महापालिकेच्या समन्वयाअभावी या स्मशानात मूलभूत सुविधांचा पूर्णत: अभाव असून स्मशानभूमी उघड्यावरच खितपत पडली आहे.परिणामी पावसाळ्यात तसेच अवकाळी पावसात लाकडे भिजून अंत्यविधी पुर्ण करताना नाकीनऊ येत आहेत.त्यामुळे प्रेत जाळायचं तरी कसं ?” असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.वसई-विरार महापालिकेची स्थापना होऊन तब्बल १५ वर्षांचा कालावधी उलटला असतानाही पेल्हारसारख्या मोठ्या लोकवस्ती असलेल्या भागात अद्याप पालिकेने स्वतःची स्मशानभूमी उभारलेली नाही.
वनविभागाच्या जागेवर असलेल्या या एकमेव स्मशानात तांत्रिक अडचणीमुळे खर्च करता येत नसल्याचे कारण देत शेड,पाण्याची सोय,बसण्यासाठी बाकडे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.ही बाब मन विषण्ण करणारी आहे.मात्र या दोन्ही प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून परस्पर सहकार्याने या स्मशानात कायमस्वरूपी सुविधां दिल्या पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.भिजलेल्या लाकडाच्या सरणावर अंत्यविधी करताना अग्नी पेट घेत नाही. त्यामुळे गाडीचे टायर,डिझेल,तुप,जाडे मीठ यांचा सरणावर सातत्याने मारा करावा लागतो.त्यासाठी भलामोठा भुर्दंड मृताच्या नागरिकांना करावा लागतो.
पेल्हार परिसरात मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिक रहात आहेत.त्यात मजुरवर्गाची मोठी संख्या आहे.हाता-तोंडाची गाठभेट घडवताना त्यांची दमछाक होते.अशावेळी लाकडे भिजलेली असल्यामुळे अंत्यविधी साठी येणारा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.किमान ही बाब पाहून तरी पालिकेने या स्मशानात लाडके ठेवण्यासाठी गोदाम उभारावे अशी मागणी केली जात आहे.