रविंद्र माने – वसई : बोगस कागदपत्रांद्वारे उभारण्यात आलेल्या इमारतींचे प्रकरण हाताळत असताना, कागदोपत्री ५० इमारती दाखवून त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचे प्रकरण विरार पोलीसांच्या हाती लागले आहे. वसई विरारमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे ५५ इमारती उभारण्यात आल्याचे प्रकरण विरार पोलीसांनी गेल्या महिन्यात उघड केले होते. या प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील आणि दिलीप बेनवंशी या आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. त्यांच्या कार्यालयातून ग्रामपंचायत, सिडको, तहसिलदार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बोगस कागदपत्रे सापडली होती. या सर्व प्रशासकिय कार्यालयांच्या परवानग्या त्यांनी स्वतःच तयार करुन त्यावर सही शिक्केही मारले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना, प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या ५० इमारती कागदोपत्री उभ्या करुन त्यावर कर्जे घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.
विविध नागरिकांच्या नावे ही कर्जे फ्लॅटसाठी घेण्यात आली आहेत. त्यासाठी एका नामांकित डॉक्टरच्या रुग्णालयातील बनावट पे स्लिप ही तयार करण्यात आल्या होत्या. सदर आऱोपींनी बांधलेल्या अनधिकृत इमारतींवर गुन्हे दाखल होत असतानाच, आरोपींच्या संगणकात पोलिसांना अनेक इमारतींचा तपशील आढळला आहे. त्या इमारतींचा शोध घेत असताना, त्या अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बनावट सीसी (बांधकाम परवानगी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) तयार करुन इमारत अस्तित्वात असल्याचे भासवले. त्यानंतर या कागदांच्या इमारतींवर बनावट कागदपत्रे बनवून विविध बँकातून त्यांनी लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. विशेष म्हणजे या कागदांच्या इमारतीत घरे घेणारे ग्राहकही कागदांचेच (अस्तित्वात नसलेले) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इमारत आणि ग्राहक अस्तित्वात नसतानाही खात्री न करता,कागदपत्रांची तपासणी न करता आणि जागेवर जावून पडताळणी न करता ही कर्जे देण्यात आली आहेत. ही कर्जे घेण्यासाठी नामांकित डॉक्टरांच्या नावाचे ११९ बनवाट शिक्केही पोलीसांना सापडले आहेत. त्यात मुंबईतील प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ.विनोद शहा यांच्या नावाचाही शिक्का आढळला आहे. डॉ शहा यांच्या क्लिनिकमध्ये काम करीत असल्याचे भासवून, त्या कर्मचार्याच्या नावाने बनवाट पे स्लिप बनवून त्या आधारे बँकाकडून ही कर्जे घेण्यात आली आहेत. तसेच मुंबईतील दोन नामांकित रुग्णालयाच्या नावाने देखील बनवाट पे स्लिप बनवून लाखो रुपयांची कर्जे घेण्यात आली आहेत. या कर्जांसाठी बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्डही तयार करण्यात आली आहेत.
अनधिकृत इमारतीत राहणार्यांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जे घेतली आहेत. ही कर्जे कोणी आणि कशी मिळवून दिली, याचाही तपास पोलीस करीत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली जाणार आहे. डॉ.विनोद शहा यांच्या नावाचा एक शिक्का सापडल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दुजोरी दिला आहे. या प्रकरणी २३ बँका आणि काही पतसंस्थांचीही चौकशी करण्यात येत आहे. आरोपी बँकांच्या कर्मचार्यांना या घोटाळयात सहभागी करून घेत होते, त्यामुळे त्यांना तात्काळ लाखोंची कर्जे दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






