फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : पुण्याचे नेते वसंत मोरे हे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर मोरेंनी त्यांची राजकीय खेळी खेळली. आज वसंत मोरे व शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या भेटीनंतर वसंत मोरे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. वसंत मोरे यांची पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर लवकरच वसंत मोरे शिवबंधन बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मीडियारिपोर्टनुसार, वसंत मोरे हे लवकरच आगामी निवडणूक मशाल चिन्हावर लढवणार आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांना खडकवासला किंवा हडपसर या विधानसभेच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. मशाल चिन्हावर वसंत मोरे हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पुढील आठवड्यामध्ये 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभेत डिपॉजिट झाले होते जप्त
पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे पक्ष व नेते राज ठाकरे यांची साथ सोडली. यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडीसोबत बोलणी केली होती. मात्र ही बोलणी काही यशस्वी होऊ शकली नाही. आधी अपक्ष आणि नंतर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र यामध्ये त्यांचा मोठा पराभव झाला. अगदी त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होते. आता वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.