File Photo : Prakash Aambedkar
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीला जागावाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युल्यावर जर सकारात्मक निर्णय झाला नाहीतर वंचित बहुजन आघाडी ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वर्धा लोकसभेसह इतर जागाही स्वातंत्र लढणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले आहे.
अमरावती शहरात येत्या 20 जानेवारीला प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. सध्या देशात लोकशाहीची हत्या केली जात आहे. शेतकरी, सामान्यसह युवकांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना केंद्र व राज्य सरकार हे फक्त धार्मिक भावनांचा माध्यमातून राजकारण करत आहे. यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वंचितचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.
उमेदवारांची चाचणी सुरू
इंडिया आघाडीला प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला दिला आहे, पण अद्याप यावर निर्णय झाला नाही. इंडिया आघाडीशी सकारात्मक चर्चा सुरू आहे तसे न झाल्यास आमचा प्लान बी तयार असून वर्धा लोकसभेसह इतरही जागा स्वतंत्र लढणार आहे. प्रत्येक मतदारसंघात वंचितच्या वतीने उमेदवारची चाचपणी सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.