संग्रहित फोटो
कराड : भाजप व महायुती सरकारकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असून, त्याचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसणार आहे. सरकारने काढलेला जीआर हा मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे. कुणबी दाखल्याला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसींनी ओपनमध्ये येणे हेच त्यांच्या फायद्याचे ठरेल, त्यासाठी त्यांना आपण तसे आवाहन करणार असल्याचे उपहासात्मक विधान काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, झाकीर पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
वडेट्टीवार म्हणाले, भाजपचा मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच आरक्षण मान्य नाही, मग त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. सध्याचे सरकार दोन समाजांना आमनेसामने उभे करून जाती-धर्माचे राजकारण करत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे. हे सरकार एकाच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्याला खोटे आश्वासन देत वाऱ्यावर सोडून केवळ बनवाबनवी करत आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अतिवृष्टीची मदत नाही. संक्रमण काळात त्यांना अपेक्षित आधार दिला जात नाही. लाडक्या बहिणींना दोन महिन्यांपासून हफ्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. आता तर कंत्राटदारांची बिलेही थकली आहेत, त्यामुळे त्यांच्याही आत्महत्या सुरू झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडला जाईल, मात्र जनतेने त्याला भुलू नये, असंही वडेट्टीवार म्हणाले.
अंतर्गत संघर्षात महायुती
राज्यात शिंदे-फडणवीस यांच्यातील संघर्ष उघड होत असून, भाजपपेक्षा शिंदे गटातील मंत्र्यांमध्येच जास्त अस्वस्थता आहे. महायुतीतील तिघे सत्तेतील वाट्यासाठी भांडत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मतचोरी करून आलेले सरकार
महायुती सरकार हे मतांची चोरी करून आलेले सरकार आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे या सरकारचे कसलेही लक्ष नाही, त्यांना याचे काहीही देणे-घेणे नाही, असाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.