वडगाव मावळ येथील महसूल कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याचे उघड झाले. (फोटो - सोशल मीडिया)
Maval News : वडगाव मावळ : सतीश गाडे : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले तलाठी कार्यालय आणि मंडलाधिकारी कार्यालय प्रत्यक्षात रिकामे असल्याचे वास्तव नागरिकांपुढे आले आहे. मावळमध्ये फक्त कार्यालय असून यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी नसल्याने नागरिकांची कामे अडकून पडली असून, दररोज सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
दरम्यान, संबंधित तलाठी व मंडलाधिकारी यांनी स्वतःची स्वतंत्र खाजगी कार्यालये तयार करून त्या ठिकाणी कामे करण्यास सुरुवात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, सरकारी कार्यालये ओस पडलेली असताना त्यांचे खाजगी ‘दरबार’ मात्र रोज गर्दीने फुललेले दिसत आहेत. ही धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते दत्ता काजळे यांनी उघड केली आहे. त्यांनी केलेल्या तपासणीत कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्याचे, तसेच मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : “त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
नागरिकांना जात-पात, वाद न बघता दिली जाणारी मूलभूत महसूल सेवा ७/१२ उतारा, फेरफार, घरपट्टी, प्रमाणपत्रे ही सर्व कामे विलंबित होत असून शेकडो नागरिक अडचणीत सापडले आहेत. “अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा!”
अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे.
हे देखील वाचा : ‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! स्वारगेट स्थानकात चार्जिंग सुविधा उपलब्ध; सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन बोर्ड
डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता
डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता केवळ १५ रुपयांमध्ये अधिकृत ७/१२ उतारा मिळणार आहे. यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज नसेल. हा मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. यामुळे राज्यामध्ये महसूल विभागामध्ये डिजिटल क्रांती झाली असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील डिजिटल साताबारा निघत होते. पण त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज असे. गावात तलाठी आणि सज्जा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तलाठ्याच्या आले मना तेव्हा काहीही होत असेल. पण आता या प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजात कायदेशीर व वैध असतील असे शासनाचे परिपत्रक जारी झाले आहेत.






