फोटो - सोशल मीडिया
वाशीम : गेल्या रविवारी (दि.15) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येणार आहे. आतापर्यंत गिरविण्यात आलेला कित्ता आताही वाशीममध्ये गिरविला जाणार आहे. असे असले तरी पालकमंत्री कोण होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
हेदेखील वाचा : तुम्ही पण एक दिवस मुख्यमंत्री होणार’; खुद्द CM देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
वाशीम जिल्ह्यात रिसोड, वाशीम आणि कारंजा असे विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. अमित झनक (काँग्रेस) हे रिसोडमधून, श्याम खोडे (भाजप) हे वाशीममधून तर सई डहाके (भाजप) यांनी कारंजामधून विजय मिळविला. महायुतीचा विचार केल्यास तीनपैकी दोन आमदार महायुतीच्या भाजपचेच आहे. मात्र, त्यांना कॅबिनेट वा राज्यमंत्रिपदाची गवसणी घालता आली नाही. असे असताना आता पालकमंत्री कोण होणार, यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
पालकमंत्री की झेंडा मंत्री?
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे शंभुराज देसाई हे पालकमंत्री म्हणून लाभले होते. सत्ता परिवर्तनानंतर जिल्ह्याला शिंदेसेनेचे संजय राठोड पालकमंत्री म्हणून लाभले होते. या दोघांचाही कार्यकाळ झेंडा-टु-झेंडाच असा राहिला. आताही पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याच्या मंत्र्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याने ‘झेंडा मंत्री’ म्हणूनच पुन्हा एकदा ठपका लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे दोन मंत्री स्पर्धेत
जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. दुसरीकडे गतवेळचे संजय राठोड हेसुद्धा वाशीमसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऐनवेळी दुसऱ्याच कुणाचे नाव पालकमंत्रिपदासाठी समोर येऊन आश्चर्याचा धक्का बसू शकतो. मात्र, पाकलमंत्रिपद आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला मिळायला हवे, यासाठी महायुतीतील भाजपसह शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जोर लावणे सुरू आहे. शेजारच्या जिल्ह्यातील आकाश फुंडकर यांच्याकडेही पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात येऊ शकते.
विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ
विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येणार आहे. आतापर्यंत गिरविण्यात आलेला कित्ता आताही वाशीममध्ये गिरविला जाणार आहे.
हेदेखील वाचा : Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर