अमरावती : नागपूर येथे जोरदार स्वागत झाल्यानंतर शहरात दाखल झालेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे शनिवारी (२८ मे) सायंकाळी ७.१५ वाजता शहरातील रहाटगाव चौकात जंगी स्वागत करण्यात आले. कारच्या सनरुफ मधून बाहेर निघत भगवी पगडी व दुपट्टा घातलेल्या दाम्पत्याने समर्थकांना अभिवादन करीत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. यावेळी क्रेनच्या मदतीने गुलाब पुष्पहार घालत दोघांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रॅलीने वेलकम पाइंट तसेच पंचवटी चौकात पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे जोरदार स्वागत झाले. यावेळी झालेल्या गर्दीमुळे रहाटगाव चौक ते पंचवटी चौका पर्यंत तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती.
भीम ब्रिगेडने राणा दाम्पत्याला रोखले
पंचवटी चौकातून राणा दाम्पत्याची रॅली इर्विन चौकात पोहोचली. यावेळी वाहनातून उतरत राणा दाम्पत्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जात होते. राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसा पठन करणार असल्याची माहिती भीम ब्रिगेडला प्राप्त झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार टाकण्यास नव्हे तर, त्या परिसरात हनुमान चालिसा पठन करू नये, म्हणून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध करीत राणा दाम्पत्यास अडविण्याचा प्रयत्न केला. भीम ब्रिगेडने राणा दाम्पत्यास अडविल्याने यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान साधत पोलिसांनी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राणा दाम्पत्यापासून दूर करीत ताब्यात घेतले. भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्यासह १९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हा तर बेशरमपणाचा कळस – पालकमंत्री यशोमती ठाकूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण जगाला मानवता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. त्यामुळे धार्मिक कट्टरता पसरविणाऱ्या लोकांनी राष्ट्रसंतांचे नाव घेत त्यांचा अपमान करु नये. असे कृत्य करणाऱ्या लोकांच्या त्यांच्या कृत्यावर शरम वाटायला हवी. मात्र, खालच्या स्तराचे राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने बेशरमपणाचा कळस गाठला असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.