पावसाळी अधिवेशनात कोणते निर्णय घेणार? पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी केले मुद्दे स्पष्ट!
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत आहे. अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही प्रश्नांवर चर्चा करण्याची विरोधकांची तयारी नाही. सभागृहात चर्चा करण्याची तयारी नाही. केवळ दिशाभूल करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे.”
‘केवळ खोटे नॅरेटिव्ह पसरवणे हेच विरोधकांचे काम’
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी दिलेल्या पत्रात नवीन काही नाही. केवळ खोटे नॅरेटिव्ह तयार करून स्वत:ची पाठ विरोधक थोपटू लागले आहेत. विरोधकांची ‘गिरे तो टांग उपर’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते आज (ता.२६) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ही सरकारची आधीपासूनच भूमिका राहिली असल्याचे म्हटले आहे.
‘हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे’
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे हे सरकार आहे. एक रुपयामध्ये पीक विमा देणारे हे सरकार आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना सुरु केल्या आहेत. “शासन आपल्या दारी” यासारखी मोठी योजना सरकारने सुरु केली. त्यामुळे कोट्यवधी लोकांना याचा फायदा झाला आहे. सरकारने ‘शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब लोकांसाठी सरकारने काम केले असून, उद्याच्या अधिवेशनामधूनही ज्येष्ठ, तरुण, माता-भगिनींच्या हिताचे निर्णय होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुका येत आहेत. आज आपण पाहातोय, सरकारी नोकऱ्या भरती सुरु केलेली आहे, पोलिस भरतीदेखील सुरु आहे. हे सरकार सर्वसमावेशकपणे काम करत आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे.
खोटे बोलू पण रेटून बोलू, अशी विरोधकांची मानसिकता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, खोटे बोलू पण रेटून बोलू, अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. विरोधकांनी आधी आरशात बघावे, आणि आमच्यावर टीका करावी. विदर्भातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, हा विरोधकांचा आरोप खोटा आहे. खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याची फॅक्टरी विरोधकांनी उघडली आहे. परंतु, याचा पर्दाफाश आम्ही अधिवेशनात करू, मविआ काळात बंद केलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत. ८७ प्रकल्प महायुतीने पूर्ण केले आहेत. ड्रग्जच्या विरोधात आम्ही कारवाई सुरू केली आहे. परकिय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर आहे. आमची चर्चेची तयारी आहे. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे, आम्ही सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ, असेही ते यावेळी म्हणाले आहे.
तर यावेळी अजित पवार यांनी विरोधकांनी पत्रात मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विरोधकांनी मांडलेल्या एका मुद्द्यावर अजित पवारांनी शल्य व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आहे की, अलिकडे बघतोय की काही वर्षांपासून विरोधक चहापानाला येत नाहीत. ते एक पत्र देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे टाकत असतात. त्यांनी आज एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतील श्लोकाच्या मुद्द्यावर केली. याबाबत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.