पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: काल पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात घडला. मद्यधुंद कार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवले. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे. सदाशिव पेठ हा कायमच वर्दळ असणारा भाग आहे. या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
१२ विद्यार्थ्यांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांची आज एमपीएससीची परीक्षा असल्याचे समोर येत आहे. जखमी मुलीच्या कंबरेल गंभीर दुखापत झाल्याचे समजते आहे. मद्यधुंद वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
सदाशिव पेठेत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत १२ जणांना उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्या आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे. वैद्यकीय चाचणीनंतर वाहनचालक मद्यधुंदअवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कालच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
हा भीषण अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तर या मुलांची परीक्षा नंतर घेता येईल का यासंदर्भात आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे. दरम्यान कोर्ट या आरोपीला कोणती शिक्षा सुनावते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आता जखमी मुलांच्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत फडणवीस सरकार काय भूमिका घेणार किंवा कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?
पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात घडला. यात १२ विद्यार्थी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर या सर्वांच्या उपचाराचा खर्च शासनातफे केला जाणार आहे.
नेमके काय घडले?
कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ म्हणून ओळखला जाणारा पोर्षे अपघातानंतर आता पुण्याच्या मध्यभागात ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकरण घडले असून, एका मद्यपी चालकाने भरधाव वेगात चहाच्या टपरीवर थांबलेल्या तरुण-तरुणी अश्या तबल १२ जणांना उडवल्याची खळबळजनक घटना घडली. हा भीषण अपघात काल सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला. यातील दोघे गंभीर जखमी असून, इतरांवर प्राथमिक उपचारकरून सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मित्राला पकडले आहे.
Pune Accident: पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’; भर वस्तीत 12 जणांना उडवले, सदाशिव पेठेतील घटना
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) याच्यासह गाडीत बसलेला मित्र राहुल गोसावी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.