फोटो सौजन्य: iStock
संतोष पेरणे: नेरळ रेल्वे स्थानकात नेरळ गावचे रहिवाशी क्षेत्र असलेल्या भागातून बहुसंख्य प्रवासी स्थानकात येत असतात.त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी यांना तिकीट काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन तिकीट घर बांधले आहे.मात्र त्या ठिकाणी असलेल्या तिकीट घरातील पाच पैकी एकच तिकीट खिडकी बहुसंख्य वेळ खुली असते. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाचा हा कोणता प्रकार आहे असा प्रश्न प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात दोन फलाट असून मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकल या फलाट दोन वरून जातात. तर फलाट एक वरून कर्जत, खोपोली आणि पुण्याकडे जाणाऱ्या काही उपनगरीय लोकल यांची वाहतूक होत असते. त्यात फलाट एकचे बाहेर असलेल्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे प्रवासी वर्ग तर फलाट दोन येथून येणारा प्रवासी वर्ग हा प्रामुख्याने नेरळ गावातील प्रवासी असतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वे कडून फलाट दोन आणि एक वर स्वतंत्र तिकीट घर बांधण्यात आले आहेत.
फलाट एक वरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी असलेले तिकीट घर हे केवळ अर्धा दिवस खुले असते तर फलाट दोन वरील तिकीट खिडकी ही पूर्णवेळ सुरू असते. फलाट २४ तास तिकीट काढण्याची सेवा असल्याने त्या ठिकाणी उपनगरीय लोकल यांची तिकीट काढण्यासाठी पाच तिकीट खिडक्या बनविण्यात आल्या आहेत. त्यांचा फायदा उपनगरीय लोकल पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावे हा उद्देश आहे. मात्र त्यातील केवळ दोनच तिकीट खिडक्या या कार्यरत असल्याचे त्या तिकीट खिडकीवर लावण्यात आलेल्या वेळेचे नियोजन यावरून दिसून येते.त्यामुळे प्रवासी वर्गाची कुचंबणा होत असते.
नेरळ स्थानकातील तिकीट घर येथील पाच तिकीट खिडकी पैकी बहुसंख्य वेळ केवळ एकच तिकीट खिडकी कार्यरत असल्याचे आढळून येते. बहुसंख्य वेळ तेथील दुसरी तिकीट खिडकी ही दुरुस्तीचे कामासाठी बंद असल्याचे आढळून आले आहे.त्याचा थेट परिणाम प्रवासी यांच्यावर होत असून लोकल पकडण्यासाठी धावपळ करून तिकीट खिडकीवर आलेल्या प्रवासी यांना वेळेत तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्यांना तिकीट अभावी लोकल सोडायला देखील लागते.दुसरीकडे दुसरी तिकीट खिडकी बहुसंख्य वेळ बंद का असते असा प्रश्न प्रवासी विचारत असतात.मात्र तिकीट खिडकीवर असलेले रेल्वे कर्मचारी हे कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यावेळी प्रवासी हतबल होऊन निघून जातो अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते जब्बार सहेद यांनी केली आहे.पाच तिकीट खिडक्या असून त्यातील दोन तिकीट खिडक्या सुरू ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.त्यातही एकच तिकीट खिडकी ही पूर्णवेळ खुली असते.तर दुसरी तिकीट खिडकी ही अर्धवेळ किंवा दिवसातून केवळ चार पाच तास खुली असते.त्यात गर्दीच्या वेळी तिकीट खिडकी खुली नसल्याने प्रवाशांचे हाल होतात.त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत सीसीटिव्ही कॅमेरे तपासून घ्यावेत आणि ऐन गर्दीच्या वेळी तिकीट खिडकी बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जब्बार सहेद यांनी केली आहे.