सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नक्की आहेत तरी कोण?
लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर कॉंग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पदभार स्वीकारला आहे. दरम्यान महाराष्ट्रात कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते असताना हर्षवर्धन सपकाळ यांचीच प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड का केली? जाणून घेऊया…
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
सन १९९९ ते २००२ या काळात सपकाळ हे बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती.
सन २०१४ ते २०१९ या काळात हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार होते.
राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत
राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ म्हणून सपकाळ यांनी ओळख
”हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी मुंबईत दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष म्हटले की, पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या दिमतीला असते. मात्र, हर्षवर्धन सपकाळ सोमवारी खासगी कारने मुंबईत दाखल झाले. मात्र त्यांनी मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात मुक्काम केला. रात्रभर ते जमिनीवर झोपले. याबाबत त्यांना विचारलं असता , ते म्हणाले की, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरंजामी आणि तालेवार नेत्यांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झालेल्या काँग्रेस पक्षातील हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
Mamata Banerjee : महाकुंभ नव्हे मृत्यूकुंभ! ममता बॅनर्जी यांचा योगी सरकारवर हल्लाबोल
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. यापैकी एखाद्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद मिळेल, याची अनेकांना खात्री होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने सर्वांचे अंदाज चुकवत राजकीय वलयापासून कोसो दूर असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.