रत्नागिरी : सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी सर्व पक्ष करत आहेत. लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे एकही पक्ष विरोधी पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रिफायनरी प्रकल्पावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा. ज्यांनी अडीच वर्षे राज्य केलं त्यांनी या कोकणासाठी काहीच केलं नाही त्यामुळे विकासाचं परिवर्तन व्हावं यासाठी भाजपाचा खासदार निवडून येणं आवश्यक आहे. उमेदवार निश्चित होईल, आमचा भाजपाचा कमळाचा प्रचार सुरू आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही असे नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे काम झाले आहे. इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी उद्योग आले पाहिजेत. चिपळूणमध्ये विमानतळ होण्याची दृष्टीने आपले प्रयत्न राहतील, तरी भाजपच्या महायुती उमेदवाराला अडीच लाखांपेक्षा मताधिक्य मिळाले पाहिजे, यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा जास्तीत जास्त वाटा असेल, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म लघु, उद्योग, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.
या मेळाव्याला माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे, माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, खेर्डीचे माजी उपसरपंच विनोद भुरण, सौ. स्नेहा मेस्त्री, मनसे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेशिर्के, भाजपा कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे नारायण राणे म्हणाले म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला नगरसेवक ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली, अशी आपली भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे मोठे काम केले आहे. भारत अर्थव्यवस्थेत ३ ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या. यामध्ये रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचा खासदार अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाला पाहिजे. यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मोठे योगदान असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
खासदार राऊत यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, या भागातील विद्यमान खासदारांने आपला ५७ % खासदार निधी खर्च केलेला नाही. तर १० टक्के कमिशन ठेकेदारांकडून मागत असल्याचा आरोप यावेळी केला. या खासदाराकडून विकासात्मक काम शून्य झाले आहे, अशी टीका देखील राऊत यांच्यावर ना. राणे यांनी केली. तर दुसरीकडे मोदींसारख्या नेतृत्वाला ‘अब की बार भाजप तडीपार’ अशी भाषा उद्धव ठाकरे करीत आहेत. मात्र, तुमची कुवत काय ? तुमचे सध्या खासदार किती उरले आहेत. या निवडणुकीत तो आकडा शून्यावर येईल, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आज २ लाख लाख ४० हजार दरडोई उत्पन्न आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचं थोडं कमी आहे. मात्र, ते वाढविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. परंतु यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे, अशी अपेक्षा ना. नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली. दोडामार्गला ५०० कारखाने आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मेडिकल इक्विपमेंट व फूड प्रोसेसिंगबाबतचे उद्योग देखील तिथे येणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात देखील या दृष्टीने प्रयत्न होणार असून चिपळूणमध्ये विमानतळ होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील, असा विश्वास उपस्थितांना राणे यांनी यावेळी दिला.
तर ते आणखी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या योजनांमुळे शेवटच्या घटकांपर्यंत लाभ झाला आहे, असे सांगताना या योजनांचा आढावा घेतला. तसेच लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग खात्याची देखील माहिती दिली. या खात्यामार्फत अनेकांना रोजगार मिळू शकतो, हे देखील सांगितले. कोकणातील तरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायकडे वळले पाहिजे असे आवाहन केले. २०४७ पर्यंत स्वतंत्र भारत देशाला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा जगात विकसित देश म्हणून भारताची ओळख असेल. भारताला जागतिक अर्थसत्ता बनवण्यासाठी आपण मोदींचे हात बळकट करूया, असे शेवटी ना. नारायण राणे यांनी आवाहन केले.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपा उतरत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
उदय सामंत – फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया
उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर नारायण राणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीही भेटू शकतो, तुम्हीही भेटू शकता या जागेबाबत सगळं ठरलेलं आहे. एका व्यक्तीच्या सांगण्याने अवघड मी मानत नाही, आम्ही अवघडचं सोप्पं करू एवढी ताकद आमच्यात आहे असे नारायण राणे म्हणाले. सोप्पं करू कोणी उगाच काही गोष्टी बोलू नयेत, महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये आणि अपशकुन पण करू नये या मताचा मी आहे. मोदी साहेबांची हॅट्ट्रिक होईल, 400 खासदार निवडून येतील या 400 पार मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हक्काचा खासदार असणारच आणि त्यादृष्टीने प्रयत्न आहेत असे नारायण राणे म्हणाले.