सातारा : आपण राजघराण्यात जन्माला आलो आहोत. त्या घराण्याच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रणाची गरज पडत नाही. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय? असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर लगावला. प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास खासदार उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशिरा निमंत्रण मिळाल्याचे सांगत पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री किंवा इतर कोणाचे आपल्याला फोन आला नसल्याचे सांगितले होते. त्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली.
निमंत्रणच कशाला हवे ?
यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मला जिल्हाधिकारी कार्यालयाचे निमंत्रण आले होते. परंतु आपण ज्या घराण्यात जन्माला त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रणाची गरज पडत नाही. प्रतापगडावरील देवस्थान आपल्या मालकीचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरजच काय? आपण आपला घरचा कार्यक्रम समजून थेट जायला हवे होते, अशी टीका त्यांनी केली.
भडक बोलणे आक्रमकता नव्हे
राज्यपालांच्या भूमिकेबाबत तुम्ही आक्रमक दिसत नाही. या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भडक बोलणे म्हणजे आक्रमकता नव्हे. राज्यपाल बदलाचा निर्णय महाराष्ट्रात होत नाही. तो केंद्राकडून होतो. याबाबत देवेंद्र फडणवीस सर्वांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.






